नवी दिल्ली, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाची कार्यकर्ता म्हणून काम करणार, असे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा म्हणाल्या. त्या दिल्लीत बोलत होत्या. नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन अपक्ष म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकली होती. यावेळी नवनीत राणा भाजपाच्या उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उमेदवारी निश्चित होताच भाजपात प्रवेश केला. यानंतर नवनीत राणा यांनी भाजपाच्या महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील प्रमुख नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. नवनीत राणा यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत नवनीत राणा यांनी पक्षाकडून मिळालेल्या उमेदवारीसाठी आभार प्रकट केले आणि आशीर्वाद घेतले. भाजपाची कार्यकर्ता म्हणून काम करणार, असे नवनीत राणा म्हणाल्या. याआधी गुरुवारी नवनीत राणा यांनी मुंबईत भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.