रावेर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : बहुचर्चित रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे विरूद्ध खडसे लढत होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रकृतीच्या कारणानं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय. तसंच मुलगी रोहिणी खडसेही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. रावेरची जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहे. पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक घेतली. शनिवारपर्यंत उमेदवार ठरवण्यात येईल अशी माहिती खडसेंनी दिली.
एकनाथ खडसे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मला डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. तसेच रोहिणी खडसे ह्यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कधीही विचार केला नव्हता. त्या केवळ विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असा विचार करून मागच्या चार-पाच वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे ह्या सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या घोषणेमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे कुटुंब आमने-सामने येईल, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.