लंके विखेंचं गणित बिघावणार ?

लंके विखेंचं गणित बिघावणार ?

नगर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : आमदार नीलेश लंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची औपचारिकता उरली आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यात लढतदेखील निश्चित होताना दिसते. या लढतीची गणिते आता मांडली जाऊ लागली आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने पुन्हा एकदा विखे पाटील कुटुंबावर विश्वास दाखवला आहे. पण ही निवडणूक विखेंना तितकीशी सोपी असणार नाही. 1991 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी कंबर कसल्याचे सांगितले जात आहे. या वेळी ते आमदार नीलेश लंके यांना मैदानात उतरवून विखेंच्या पराभवाची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

आमदार लंकेंनी गुरुवारी पुण्यात आपण शरद पवारांसोबतच असल्याचे म्हटले. आपण आधीही शरद पवारांच्या विचारधारेसोबतच होतो, त्यांचा आदेश मानणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीत नगरची जागा राशपकडे आहे, पण पवारांकडे विखेंना धूळ चारू शकेल, असा उमेदवार नव्हता. पण लंकेंनी पवारांसोबत असल्याचे सांगतिल्याने तेच विखेंविरोधात उमेदवार असतील, आणि पक्षप्रवेश न करताच लंके दक्षिण नगरमधून मविआचे उमेदवार असतील अशी लगेच घोषणा शरद पवारांनी केली.

लंकेची वाटचाल कोलांटउड्या मारणारी

आमदार लंके यांनी राजकारणात अनेक उड्या मारल्या.
बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून सुरुवात केली.
लंके शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष होते
तत्कालीन पारनेरचे आमदार विजय औटी यांच्याशी त्यांचे बिनसले.
उद्धव यांनी लंकेंची पक्षातून हकालपट्टी केली.
निलेश लंके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
औटी यांच्या विरोधातच पारनेर-नगर मतदारसंघातून विजयी झाले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथम ते शरद पवार गटात सहभागी झाले.
नंतर काही दिवसातच अजितदादा गटात सहभागी झाले.
शिंदे – फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळी लंके अनुपस्थित होते

लंके आणि विखे यांच्यात वैमनस्य

नगर-पारनेर मतदारसंघातील वर्चस्वावरून आमदार लंके व भाजप खासदार विखे यांच्यामध्ये राजकीय वैमनस्याची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांच्यामध्ये पारनेरमधील विकासकामांच्या श्रेयवादावरून खडाजंगी रंगली. त्यानंतर आमदार लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघ सोडून नगर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी खासदार विखे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली. परिणामी आमदार लंके जरी महायुतीत असले तरी विरोधी महाविकास आघाडीच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळू लागला. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीवरून जिल्हा भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपमधील जुने निष्ठावान पदाधिकारी विखे पिता-पुत्रांपासून अंतर राखून आहेत. गेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे पक्षश्रेष्ठी करत होते. मात्र घडले उलटेच. पक्षाच्या पाच पराभूत आमदारांनी विखे यांच्या विरोधात तक्रारी केल्या व त्यांना पराभव जबाबदार धरले. मात्र तरीही विखे यांचे पक्षातील वजन वाढत गेले. भाजपच्या केंद्रीय बलाढ्य नेतृत्वाला भेटण्यासाठी राज्यातील प्रदेश भाजपची विखे यांना आवश्यकता राहिली नाही.

नगर दक्षिणमधून लंके मैदानात ?

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मागील दोन वर्षापासून ते लोकसभेची तयारी करत असल्याचे चित्र आहे. निलेश लंकेंना जर महाविकास आघाडीतून नगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉ. सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान मिळू शकते, अशी सध्या चर्चा रंगली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version