कोलकाता, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : संदेशखाली येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या ममता सरकारला दिले आहेत. आरोपी शाहजहां शेख याला सीबीआयच्या ताब्यात द्या असेही निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या सरकारला दिले आहेत.
आरोपीचा राज्यात राजकीय प्रभाव आहे. यामुळे तपास पोलिसांनी नाही तर सीबीआयने करावा, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. याआधी मंगळवारी शाहजहां शेख याला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. पण या आदेशाचे पालन झाले नाही. पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि तातडीने सुनावणी घ्यावी अशीही मागणी केली. पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा शाहजहां शेख याला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले.
ईडीने शाहजहां शेख याची १२.७८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात बँक ठेवी, संदेशखाली आणि कोलकाता येथील प्रत्येकी एक सदनिका, शेतजमीन, मत्स्यपालनासाठीची जमीन या मालमत्तांचा समावेश आहे.
कोण आहे शाहजहाँ ?
शाहजहां शेख हा तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांचा निकटवर्तीय
संदेशखालीत तृणमूलचा ब्लॉक अध्यक्ष
आधी फेरीवाला, २००३ मध्ये स्थानिक राजकारणात प्रवेश
समाजसेवेच्या नावाखाली परिसरात दमदाटी
शाहजहांवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप
शाहजहांकडे करोडोची संपत्ती असल्याचा दावा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.