सिमला, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सहा जणांची आमदारकी रद्द झाली. विधानसभाध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी हा निर्णय दिला. आमदारकी रद्द झालेल्या सहा जणांनी निवडणुकीच्यावेळी पक्षादेशाचे उल्लंघन करत काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांच्याऐवजी भाजपाच्या हर्ष महाजन यांना मतदान केले होते.
राज्यसभेसाठी होणारे मतदान हे गुप्त नसते. पक्षादेश देणाऱ्या व्यक्तीला मतपत्रिका दाखवून नंतर मतदान करावे लागते. खुल्या मतदानाची प्रक्रिया असूनही राज्यसभेच्या निवडणुकीवेळी हिमाचलमध्ये काँग्रेसचे सहा आमदार फुटले, त्यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले. फुटलेल्या आमदारांविरोधात पक्षादेशाच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई झाली. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, देवेंद्र भुट्टो, इंद्र लखन पाल, रवी ठाकूर आणि चैतन्य शर्मा या सहा जणांची आमदारकी रद्द झाली.
सहा जणांची आमदारकी रद्द झाल्यामुळे हिमाचल प्रदेशच्या विधानसभेतील आमदारांची एकूण संख्या ६८ वरून ६२ वर आली आहे. काँग्रेस आमदारांची संख्या ४० वरून ३४ वर आली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या २५ होती आणि तेवढीच आहे. अपक्ष आमदारांची संख्या तीन होती आणि तेवढीच कायम आहे. बहुमताचा आकडा ३५ होता. आता बहुमताचा आकडा ३२ झाला आहे. याक्षणी काँग्रेसकडे बहुमत असल्याचे चित्र आहे. पण आणखी काही आमदार फुटले आणि अपक्षांकडून काँग्रेसला पाठिंबा मिळाला नाही तर सरकार संकटात सापडण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीवेळी अपक्षांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. अपक्षांनी त्यांच्या भूमिकेत बदल केला नाही आणि काँग्रेसचे तीन – चार आमदार फुटले तरी हिमाचल प्रदेशचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.