हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार संकटात ?

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार संकटात ?

सिमला, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान आणि मतमोजणी झाली. राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यामुळे राज्यसभेच्या एका जागेवर हमखास त्यांचाच विजय होईल असा अंदाज आधी व्यक्त होत होता. प्रत्यक्षात काँग्रेसच्या सहा आणि इतर पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. यामुळे काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला आणि भाजपाचे हर्ष महाजन यांचा विजय झाला. यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यसभेच्या निकाल जाहीर झाल्यानंतर बारा तासांच्या आत मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला. विक्रमादित्य हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. विक्रमादित्य यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे सहा आमदार संपर्क क्षेत्राबाहेर गेले. हे आमदार भाजपाच्या संपर्कात असून एका सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. या घडामोडींनंतर काँग्रेसचे सरकार अल्पमतात गेले. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने काँग्रेस अल्पमतात असल्याचा दावा केला. विधानसभाध्यक्षांनी भाजपाच्या २५ पैकी १५ आमदारांना निलंबित केले. यामुळे सभागृहात असलेल्या सदस्यांच्या संख्येआधारे काँग्रेस सरकार बहुमतात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काही तासांपूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू राजीनामा देणार असल्याचे वृत्त आले. पण आपण राजीनामा देणार नाही असे सांगत सुक्खू यांनी सरकार सुरक्षित असल्याचा दावा केला. भाजपा सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला. एक योद्धा आहे आणि योद्ध्यासारखा लढेन असे म्हणत त्यांनी सरकार सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहील असे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version