गुरू शिष्याची एकाच दिवशी एक्झिट

गुरू शिष्याची एकाच दिवशी एक्झिट

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी लोकसभाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी या दोन्ही नेत्यांचं गुरू शिष्याचं नातं… शुक्रवारी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी एकाच दिवशी दोघांचं निधन झालं. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना १९९७ साली त्यांनी राजेंद्र पाटणी यांना स्थानिक स्वराज्य संस्था अकोला मतदार संघातून विधान परिषदेवर पहिली संधी दिली होती. राजेंद्र पाटणी यांचा हमखास विजय व्हावा यासाठी निवडणुकीत स्वतः मनोहर जोशी यांनी लक्ष घातले होते. पाटणी यांच्या कामगिरीची दखल घेऊन जोशींनी २००४ मध्ये त्यांना उमेदवारी मिळवून दिली आणि विधानसभेवर पाठवले. पुढे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि २०१४ मध्ये राजेंद्र पाटणी यांनी भाजपात प्रवेश केला. पक्ष बदलला तरी मनोहर जोशींसोबतचे जिव्हाळ्याचे नाते राजेंद्र पाटणी यांनी जपले. अनेकदा जाहीर भाषणांमध्ये आमदार राजेंद्र पाटणी यांनी मनोहर जोशी आपले राजकीय गुरू असल्याचे सांगितले होते. या गुरु शिष्याचं शुक्रवारी एकाच दिवशी निधन झाले.

पाटणींच्या घरी जोशी

राजेंद्र पाटणी यांचे वडील सुखानंद पाटणी हे वाशिम जिल्ह्यातील व्यापारी होते. मनोहर जोशी यांचे सुखानंद पाटणी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळे वाशिमच्या दौऱ्यावर असताना मनोहर जोशी पाटणींच्या घरी जायचे. या निमित्तानेच मनोहर जोशी आणि सुखानंद पाटणी यांचे पुत्र राजेंद्र पाटणी यांची ओळख झाली आणि वाढली. राजेंद्र पाटणी यांच्यातील गुण जोखून मनोहर जोशी यांनी त्यांना राजकारणात आणले.

कोण होते मनोहर जोशी ?

माजी लोकसभाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (८६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे निधन झाले. याआधी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेना – भाजपा युतीचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. जावयामुळे अडचणीत सापडल्यानंतर मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतर शिवसेनेकडून लोकसभेत खासदार म्हणून गेलेल्या मनोहर जोशी यांनी काही काळ अवजड उद्योगमंत्री म्हणून काम केले. नंतर लोकसभाध्यक्ष म्हणून मनोहर जोशी यांनी प्रभावी कामगिरी केली. उद्धव यांच्या कार्यकाळात हळू हळू मनोहर जोशी राजकीय प्रवाहातून दूर गेले. मागील अनेक वर्षांपासून मनोहर जोशी राजकारणापासून लांब होते.

मनोहर जोशींच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. नगरसेवक, महापौर, विधानपरिषद व विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री असा त्यांचा ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतचा संघर्षमय व प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पीढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. अभ्यासू व कुशाग्र बुद्धीमत्ता, फर्डे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होते.

कोण होते राजेंद्र पाटणी ?

अनेक महिने आजारी असलेले भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे उपचार सुरू असताना रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. याआधी राजेंद्र पाटणी १९९७ ते २००३ दरम्यान शिवसेनेचे विधान परिषदेवरील आमदार होते. नंतर २००४ मध्ये शिवसेनेकडून तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाकडून ते कारंजा मतदारसंघाचे विधानसभेवरील आमदार म्हणून निवडून आले होते. अभ्यासू आणि मृदू स्वभावाचे आमदार अशी त्यांची ओळख होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version