मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरील नाराजीमुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचे पत्र ‘जय महाराष्ट्र’च्या हाती आले आहे. या राजीनाम्यामुळे काँग्रेसला महिन्याभरात महाराष्ट्रात तिसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपू्र्वी माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यानंतर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बाबा सिद्दीकींचे पक्षात स्वागत केले. यानंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.
राज्यसभेची निवडणूक जवळ आली असताना महाविकास आघाडीला एकामागून एक धक्के बसत आहेत. आधी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या हाती आला आहे. पाठोपाठ राजीनाम्यांमुळे काँग्रेसची ताकद कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करून राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आमदारांची मते भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश ?
अशोक चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर येथे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, अशीही चर्चा आहे. अमीन पटेल, अस्लम शेख, हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे चार आमदार काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य
‘आगे आगे देखो होता है क्या ? काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत’, या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षांमध्ये असलेले मुंबई मनपाचे अनेक नगरसेवक भाजपात यायला इच्छुक आहेत. पण जनतेशी जोडलेल्यांनाच भाजपात प्रवेश मिळेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया
‘काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. काँग्रेस पक्ष संविधान वाचविण्याची लढाई लढत आहे, असं असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेसला सोडून जात आहेत. हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता बघत आहे. आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
कोण आहेत अशोक चव्हाण ?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
मराठवाड्याचे भगीरथ शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र
महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष
नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभूत
काँग्रेसचा मराठवाड्यातला परिचित मराठा चेहरा
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकिर्द
१९८५ पासून अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात
१९८६ – १९९५ या काळात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष
१९८७ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी
वयाच्या ३० व्या वर्षीच खासदार बनले
१९९२ मध्ये ते विधानपरिषदेचे सदस्य बनले
१९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले
१९९५ ते १९९९ पर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव होते
२००३ मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये मंत्री बनले
८ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१० म्हणजे दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री
चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला
२०१० मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत निवडून आले
२०१५ मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
उद्धव सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले
पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार झालेत
काँग्रेसमधून बाहेर पडणे सुरूच
काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी यांनी भाजपात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कुट्टी यांनी भाजपात प्रवेश केला.
शिउबाठाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे ट्वीट
राज्यसभेत काय होणार ?
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या ५६ जागांपैकी सहा जागा महाराष्ट्रात आहेत. निवडणुकीद्वारे महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा खासदार जाणार आहेत. मतांचे ताजे गणित पाहता महायुतीकडे पाच तर महाविकास आघाडीकडे एका उमेदवाराला आरामात निवडून देण्याएवढी मते आहेत. प्रत्येकाने कोट्यानुसार उमेदवार दिला, तर निवडणूक बिनविरोध होईल. पण महाविकास आघाडीने अतिरिक्त उमेदवार दिला तर भाजपाचा चौथा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.
निवृत्त होणार असलेले महाराष्ट्रातील खासदार
नारायण राणे, भाजपा
प्रकाश जावडेकर, भाजपा
व्ही व्ही मुरलीधरन, भाजपा
अनिल देसाई, शिवसेना
कुमार केतकर, काँग्रेस
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर महाविकास आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
राज्यसभेसाठी कोणत्या नेत्यांच्या नावांची चर्चा ?
भाजपाकडून
नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर
तिसऱ्या जागेसाठी – विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्यापैकी एक
शिवसेनेकडून
मिलिंद देवरा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून
पार्थ पवार
काँग्रेसकडून
कन्हैयाकुमार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.