महुआ मोईत्रांची खासदारकी बरखास्त

महुआ मोईत्रांची खासदारकी बरखास्त

नवी दिल्ली, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : तृणणूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी लोकसभेने बरखास्त केली. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी महुआ मोईत्रांवर कारवाई करण्यात आली. त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार होत्या. खासदार निशिकांत दुबे यांनी तक्रार केल्यानंतर संसदेच्या नैतिकता समितीने महुआ मोईत्रा यांची चौकशी केली. या चौकशीत मोईत्रा दोषी आढळल्या. यानंतर समितीने त्यांचा अहवाल लोकसभेत सादर केला. या अहवालाआधारे लोकसभेत महुआ मोईत्रा यांची खासदारकी बरखास्त करण्याचा प्रस्ताव आला. हा प्रस्ताव लोकसभेने बहुमताने मंजूर केला.

६१ पैकी ५० प्रश्नांचे हिरानंदानी कनेक्शन

महुआ मोईत्रा यांनी खासदार झाल्यापासून ते खासदारकी बरखास्त होईपर्यंतच्या काळात ६१ प्रश्न लोकसभेत मांडले. यापैकी ५० प्रश्न हे फक्त हिरानंदानी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करतात त्यांच्याशी संबंधित होते. मोईत्रा यांनी विचारायचे प्रश्न हिरानंदानी समुहाकडून त्यांच्या डिजिटल अकाउंटवर तयार ठेवले जात होते. यासाठी भारत, नेपाळ, दुबई, इंग्लंड, अमेरिका येथून वारंवार महुआ मोईत्रा यांच्या डिजिटल अकाउंटला लॉग ईन करण्यात आले. हिरानंदानी समुहाने स्वतःच्या कृत्याची कबुली दिली. नैतिकता समितीने महुआ मोईत्रा यांना दोषी ठरवले. यानंतर लोकसभेने महुआ मोईत्रा यांची खासदारकी बरखास्त केली.

मनमोहन सिंह सरकारच्या काळात ११ खासदारांवर कारवाई

मनमोहन सिंह सरकारच्या काळात २००५ मध्ये एका वेब पोर्टलने स्टिंग केले होते. या स्टिंगमध्ये प्रश्न विचारण्यासाठी खासदारांना पैसे देण्याची तयारी दाखवली होती. ज्या खासदारांनी पैसे घेतले किंवा पैशांची मागणी केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात स्टिंग बघून नैतिकता समितीने तातडीने अहवाल दिला आणि २४ तासांच्या आत ११ खासदारांना बरखास्त करण्यात आले. बरखास्त केलेल्यांपैकी १० खासदार लोकसभेचे आणि १ खासदार राज्यसभेचा असे ११ जण होते.

१. सुरेश चंदेल, भाजपा
२. प्रदीप गांधी, भाजपा
३. चंद्रप्रताप सिंह, भाजपा
४. वाय. जी. महाजन, भाजपा
५. छत्रपाल सिंह लोढा, भाजपा
६. अण्णासाहेब एम के पाटील, भाजपा
७. रामसेवक सिंह, काँग्रेस
८. लालचंद कौल, बसप
९. राजाराम पाल, बसप
१०. नरेंद्र कुमार कुशवाह, बसप
११. मनोज कुमार, राष्ट्रीय जनता दल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version