मिझोराम, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोराम या ठिकाणी निवडणूका पार पडल्या. या पाचही राज्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र आता मिझोरामच्या निकालाची तारीख बदलण्यात आली आहे. मिझोराम विधानसभा निवडणूकीचा निकाल एक दिवस उशीरा म्हणजेच ४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मिझोरामच्या मतमोजणीच्या तारखेत बदल केला आहे. रविवार ३ डिसेंबर हा दिवस मिझोरामच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा असल्याने या दिवशी मतमोजणी होऊ नये अशी विनंती करणारे निवेदने अनेक स्तरांतून निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्याचे आयोगाने सांगितले. त्यामुळे या निवेदनांचा विचार करून मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
दरम्यान आता ४ डिसेंबर रोजी मिझोराममध्ये कुणाची सत्ता येणार हे समजेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.