उद्धव गटाला शेलारांनी मारला टोमणा

उद्धव गटाला शेलारांनी मारला टोमणा

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली आहे. आदित्य पर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.

पन्नास ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. पक्षात तुकडे पडले आहेत आणि त्याला समाजवादाची ठिगळे लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एखादी व्यक्ती विचारांशी किती प्रतारणा करू शकते याचे जिवंत उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जाज्वल्य हिंदुत्व मांडलं त्यांच्या सुपुत्राने काय करून दाखवले. त्याची यादी मोठी आहे. शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन म्हटलं आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी बसले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला. बाळासाहेब यांच्या सुपुत्राने अहमद पटेल समोर कुर्निसात घालणारे चित्र दाखवलं. राम मंदिरावर प्रश्न निर्माण करून राम मंदिराच्या वर्गणीची चेष्टा केली. विशिष्ट वर्गाच्या मतासाठी लांगुलचालनाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. हे सर्व देश आणि महाराष्ट्र पाहतो आहे; असेही आमदार आशिष शेलार म्हणाले.

क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने आयसीसीने पाकिस्तानच्या खेळाडूंचे स्वागत केले. या कार्यक्रमाशी भाजपचा आणि बीसीसीआयचा संबंध नाही. उद्धव ठाकरे यांच्या घरात तर दाऊदचे व्याही जावेद मियांदाद जेवून गेले. उद्धव यांचे सरकार असताना भारतावर हल्ला करणाऱ्यांना साथ देणाऱ्या याकूब मेमनच्या थडग्याला फुलांनी सजवण्यात आले. यामुळे भारत – पाकिस्तानच्या मुद्यावरून उद्धव यांनी प्रश्न विचारू नये असे आमदार आशिष शेलार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version