नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. राजस्थानमध्ये आधी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार होते. आता राजस्थान विधानसभेसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस बदलला तरी मतमोजणीची तारीख आधी जाहीर केल्याप्रमाणेच ०३ डिसेंबर आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या दिवशी होणार असल्या तरी मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
…म्हणून तारखेत बदल
राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी शुभ मुहुर्तावर अनेक लग्नसोहळे आहेत. याच कारणामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांनी आणि पक्षांनी निवडणूक आयोगाला तारखेत बदल करण्याची विनंती केली. ही विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आणि निवडणुकीची तारीख २३ ऐवजी २५ नोव्हेंबर अशी केली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
मिझोराम : ७ नोव्हेंबर २०२३
छत्तीसगड : ७ आणि १७ नोव्हेंबर २०२३
मध्य प्रदेश : १७ नोव्हेंबर २०२३
राजस्थान : २५ नोव्हेंबर २०२३
तेलंगणा : ३० नोव्हेंबर २०२३
मतमोजणी : ३ डिसेंबर २०२३
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.