अहमदनगर, ९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
हेरंब कुलकर्णी शनिवारी शाळा सुटल्यावर रासने नगर परिसरातून जात होते त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी हा हल्ला झाला. अज्ञातांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी सुनील कुलकर्णी जखमी झाले. हेरंब कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. सुनील कुलकर्णी यांच्या हाताला मार लागला. हल्ला झाला त्यावेळी बघ्यांची गर्दी होती, पण कोणीही मदतीला धावून आले नाही. हल्ल्याप्रकरणी कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.