मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांच्या मुद्यावर दिल्लीत चर्चा होणार आहे. यानंतर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दलात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
अजित पवार अनुपस्थित
मुंबईत मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. आजारी असल्यामुळे अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हते असे सांगण्यात येत आहे.
नाही झाली पत्रकार परिषद
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात. या पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली जाते. पण मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्र्यांनी जेमतेम दोन – पाच मिनिटे पत्रकारांशी बातचीत केली. उपमुख्यमंत्री भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दोघे दिल्लीला एकत्र रवाना झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.