नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला सोमवारपासून (१८ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. सरकारने याची घोषणा करताना हे ‘विशेष अधिवेशन’ असल्याचं म्हटलं होतं. परंतु हे नियमित अधिवेशन असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं. हे अधिवेशन सध्याच्या लोकसभेचं तेरावं आणि राज्यसभेचं २६१ वं अधिवेशन असल्याचं म्हटलं. हे अधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान सभागृहाचं कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ मग दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहिल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी राज्यसभेत ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, कामगिरी, अनुभव, आठवणी यावर चर्चा होणार आहे. पोस्ट ऑफिस विधेयक २०२३ आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयके राज्यसभेत मांडली जातील. ही दोन्ही विधेयके राज्यसभेत मांडल्यानंतर लोकसभेत मांडली जातील. लोकसभेत अॅडव्होकेट्स अमेंडमेंट बिल २०२३ आणि प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियॉडिकल बिल २०२३ सादर केले जातील. ही विधेयके ३ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर झाली आहेत.
याशिवाय संसदेच्या अधिवेशनादरम्यान, जी २० शिखर परिषदेचं यश, चंद्रावर चांद्रयान-३ चं सॉफ्ट लँडिंग आणि स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. ‘वन नेशन वन इलेक्शन’ आणि देशाचे नाव ‘इंडिया’ वरुन ‘भारत’ करण्याचा प्रस्तावही या अधिवेशनात आणला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या अधिवेशनाची सुरुवात जुन्या संसद भवनात होणार आहे. दुसऱ्या दिवशी (१९ सप्टेंबर) जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचं आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खासदार नवीन संसद भवनात पोहोचतील. अधिवेशनाची बैठक १९ सप्टेंबरलाच नवीन इमारतीत होणार असून तिथे २० सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरु होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.