गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी भाजपा मुंबईतून विशेष गाड्या आणि बस सोडणार

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी भाजपा मुंबईतून विशेष गाड्या आणि बस सोडणार

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त मुंबई – ठाणे पट्ट्यातून कोकणात जातात. या गणेशभक्तांच्या सोयीसाठी भारतीय जनता पार्टीने यंदा मुंबईतून कोकणसाठी विशेष गाड्या आणि बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा मुंबईतून कोकणसाठी सहा विशेष रेल्वेगाड्या आणि २५० बस सोडणार आहे. कोकणातील नागरिकांची मते मिळवण्यासाठी भाजपाने विशेष गाड्यांचे नियोजन केल्याची चर्चा आहे.

शुक्रवार १५ सप्टेंबर, शनिवार १६ सप्टेंबर आणि रविवार १७ सप्टेंबर या तीन दिवसांत भाजपा मुंबईतून कोकणसाठी विशेष गाड्या आणि बस सोडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी विशेष गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भाजपा सहा विशेष रेल्वेगाड्या आणि २५० बस व्यतिरिक्त मोदी एक्सप्रेस ही विशेष गाडी पण सोडणार आहे. मोदी एक्सप्रेस दादर येथून सुटेल. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजपा मुंबईकडून उचलला जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्यांचे आयोजन केले आहे. यापैकी दोन गाड्यांमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि द्वितीय श्रेणी वातानूकूलित डबे आहेत. तर काही गाड्या अनारक्षित आणि काही विनावातानुकूलित आहेत.

गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी पोलीस ठाण्यातून एक पास काढून घ्यावा लागेल. हा पास दाखवून गणेशभक्त टोलमाफीचा लाभ घेऊ शकतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version