गुजरात, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: गुजरातमधील भावनगर येथून उत्तर प्रदेश राज्यातील मथुरेला जात असताना झालेल्या अपघातात ११ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या जयपूर-आग्रा महामार्गावर हंत्रा गावाजवळ घडली. एका ट्रेलर वाहनाने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती भरतपूरचे एसपी मृदुल कचवा यांनी दिली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य राबवले. दरम्यान, त्यांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हंत्रा पूल नजिक बसमध्ये काही बिघाड झाला. त्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला उभी करुन त्यातील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु होता. दरम्यान, भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रेलर ट्रकने बसला पाठिमागून धडक दिली. ज्यामध्ये बसचा चक्काचूर झाला. बसमध्ये असलेले ११ जण जागीच ठार झाले तर इतर लोक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसमधील प्रवासी हे भावनगर येथील रहिवासी आहेत. ते मथुरेला निघाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने अपघात स्थळी हजेरी लावत मदत आणि बचाव कार्य सुरु केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.