राजस्थानच्या माजी मंत्र्यांचाच शिवसेनेत प्रवेश

राजस्थानच्या माजी मंत्र्यांचाच शिवसेनेत प्रवेश

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: ठाकरे गटासह काँग्रेस – राष्ट्रवादीतून नेत्यांची आयात झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये त्यांच्या पक्षाचा विस्तार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी शिंदेंच्या जयपूर दौऱ्यात राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदारानेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशोक गहलोत यांच्याशी एकेकाळी जवळीक राहिलेल्या गुढांनी त्यांना मुख्यमंत्री करण्यात मोठा वाटा उचलला होता.

राजेंद्र सिंह यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी गेले. यावेळी गुढांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होतील.

शिवसेनेचे राजस्थानचे प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुढांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत माहिती दिली होती. गुढा शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा काही दिवसांपासून होती, मात्र त्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली जात होती.

एकनाथ शिंदे जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राजस्थानसाठी त्यांच्या पक्षाच्या विस्ताराची योजना सांगतील. राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिवसेना काही जागा लढवू शकते. गुढा आता भाजपसोबत युती असलेल्या शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मागू शकत असल्याने ही एक महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिली जात आहे. अशावेळी भाजपा गुढांच्या विरोधात उमेदवार उभा करू शकत नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version