मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मागील ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव पुढे केले गेले आहे. तर जेडीयूकडून नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. त्याशिवाय इतर पक्षही आपापल्या नेत्यांची नावे पुढे करत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले आहे. तर समाजवादी पक्षाने पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांची नावे पंतप्रधानपदासाठी समोर करत अखिलेश यादव यांच्या नावाचीही दावेदारी सांगितली आहे.
दरम्यान, भाजपने इंडिया आघाडीत सुरू असलेल्या पंतप्रधान पदाच्या रस्सीखेचीवर टिप्पणी करताना नितीश कुमार हे इंडिया आघाडीमध्ये साईडलाईन झाले आहेत, असा टोला लगावला आहे. भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी सांगितले की, नितीश कुमार यांचे स्वप्न भंगले आहे. इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे आता एक प्रकारे निश्चित झाले आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार यांचे समर्थक पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत आहेत. मात्र पंतप्रधानपद दूरच त्यांच्या दावेदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. देशातील काही मोठ्या पत्रकारांनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र नितीश कुमार यांचे नाव कुठेच दिसत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.