पुणे, २० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गणरायाच्या आगमनाची आपण सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून जवळपास महिनाभराचा कालावधी राहिला आहे. त्याच दरम्यान आज पुणे शहरातील मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे जोरदार पावसात आणि ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले.
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरी वाड्याचा गणपती. मानाचा पाचवा केसरी वाडा येथील बाप्पाचे आगमन टिळक पंचांगानुसार दरवर्षी होत असते. आज या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे वारस रोहीत टिळक आणि त्यांच्या कुटुंबींयानी मोठ्या उत्साहाने विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. सकाळी पारंपारिक पद्धतीने पालखीतून गणेशाची मूर्ती टिळक वाड्यात आणण्यात आली. ही मिरवणूक पालखीमधून रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, नारायण पेठ पोलीस चौकी आणि केसरी वाडा या मार्गाने काढण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर केसरीवाडा येथे पुढील महिनाभर विविध कार्यक्रमांच आयोजन केले जाणार आहे.
त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती केसरी वाड्यातील गणेश मंदिरातच ठेवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर पासून पुन्हा गणेशोत्सवाला सुरवात होईल. या गणेशोत्सवातही दर वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.