सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा दगड

सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा दगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस येथे वास्तव्याला असलेले जागतिक कीर्तीचे भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांनी या दगडाचे वर्णन ‘दुर्मिळ आणि मी आतापर्यंत ज्याच्या शोधात होतो तो’, अशा शब्दात केले आहे.

पाण्यावर तरंगणारा दगड हा एक भौगोलिक चमत्कार आहे. या प्रकारच्या दगडाला एक पौराणिक पार्श्वभुमीही आहे. रामायणातील एका प्रसंगात श्रीरामाने आणि त्यांच्या वानरसेनेने रावणाच्या लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. यासाठी जे दगड वापरले ते पाण्यावर तरंगणारे होते, असा उल्लेख आहे. यामुळे काही ठिकाणी अशा दगडांना ‘रामसेतुचा दगड’ असेही म्हणतात.

हा ‘प्युमिस’ दगड जगाच्या सर्व भागात विशेषत: समुद्रकिनारी आढळतो. इंडोनेशिया, जपान, न्युझीलंड, अफगाणिस्तान, सिरीया, इराण, रशिया, तुर्कस्तान, ग्रीस, इटली, हंगेरी, जर्मनी, आईसलँड, उत्तर व दक्षिण अमेरिका, केनिया, इथिओपिया, टांझानिया आदि देशांमध्ये हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. तरंगणारा असल्याने समुद्राच्या पाण्यातील प्रवाहामुळे तो पाण्यातून प्रवासही करतो.

ज्या भागात जागृत ज्वालामुखींचे प्रमाण मोठे आहे, अशा अनेक देशांमध्ये याचा वापर औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. याच्यात काही प्रमाणात औषधी द्रव्येही असतात. त्यामुळे चीनसारख्या देशात हजारो वर्षे त्याचा औषधी वापर होत आहे. आंघोळ करताना अंग घासण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्या किनारपट्टीवर मात्र तो अभावानेच सापडतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version