सध्या राज्याच्या राजकारणात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेचा विषय बनला आहे. यासोबतच राजकीय वर्तुळात टीकेचे वातावरणही सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये अनेक नव्या घडामोडी घडल्या. त्यामुळे या सगळ्या नाट्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसलाच जबाबदार ठरवले आहे.
विधान परिषदेच्या निकालाने सत्ताधाऱ्यांना जबरदस्त धक्के दिले असून हा निकाल म्हणजे सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा आहे. दुसरीकडे सत्यजितला काँग्रेसने उमेदवारी दिली असती तर हे घडलेच नसते. महत्त्वाचे म्हणजे यात शिक्षक वर्गाने निकाल दिलाय. कोकणातही भाजपने मूळ शिवसेनेचाच उमेदवार नेला होता. त्यामुळे तितकी तरी जागा भाजप जिंकू शकले आहे. आम्ही तिथे कमी पडलोय हे मात्र खरे आहे. कारण लोकशाहीत तोडाफोडीचे राजकारण फार काळ चालत नाही, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे ते म्हणाले, ‘अजित पवारांकडे आता काहीच शिल्लक उरलेले नाही. त्यांच्या घरातच वाद विकोपाला गेला आहे. लोकांचे प्रश्न सोडवायला त्यांना वेळ मिळत नाही. ते नेमके काय बोलतात त्याला फार महत्त्व नाही. त्यामुळे मी म्हणतोय की, पवार अजून घोडामैदान लांब नाही, विधानसभा, लोकसभा निवडणूक येत आहे. एखादा विजय मिळाला म्हणून हुरळून जाऊ नका आणि तुम्ही भाजपची चिंताही करू नका. तुम्ही फक्त राष्ट्रवादीचीच चिंता करा, राष्ट्रवादी सांभाळायचे बघा, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.