ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशीच आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत. महाविकास आघाडीत एकत्र जाण्याची स्पष्टता आहे. या पुढचे निर्णय कसे घ्यायचे याबाबत चर्चा सुरू आहेत, असं पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. आमच्यासोबत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. आघाडीत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा प्रस्तावही आला नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. आमच्या आजवर ज्या चर्चा झाल्या त्यानुसार ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं ठरलं आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पवारांच्या या विधानामुळे आंबेडकर यांना महाविकास आघाडी स्वीकारणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.
तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचं चित्र आहे, याकडे शरद पवार यांचं लक्ष वेधलं. त्यावर पवार यांनी थेट उत्तर दिलं. त्या दोघात वाद आहे की नाही, हे मला माहीत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. जागा वाटपाची वेळच आली नाही. अजून अवकाश आहे. आमची आंबेडकरांशी चर्चा झालेली नाही. जिथं चर्चा नाही, तिथे हरकतीचा प्रश्न येतोच कुठे? ज्या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. त्यामुळे त्यांना स्वीकारायचं की स्वीकारायचं नाही हा प्रश्न येतच नाही, असंही पवार म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.