उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा पण आजपासून सुरु झाल्या आहेत. शाळा जरी १३ जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर टाळेबंदी याचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आजपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.