केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. नारायण राणे म्हणाले, संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे वेळ आल्यावर बाहेर काढणार आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे नाहीत तर ते राष्ट्रवादीचे आहेत. तसेच शिवसेना संपवण्याची संजय राऊतांना सुपारी घेतली असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.
संजय राऊत पगारी नेता असल्याचे नारायण राणे म्हणाले. तसेच राजातील संकटाबाबत महाविकास आघाडी सरकार अनभिज्ञ असल्याचे ते म्हणाले. ईडीची भाषा करणाऱ्या संजय राऊतांची ईडीने पूजा करावी. संजय राऊतांची पदासाठी लाचारी सुरू असून नारायण राणे यांनी ठाकरेंच्या दाव्यांचे दाखले दिले आहेत. तसेच शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे, असेही ते म्हणाले.
संजय राऊतांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद पार पडली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच मोदी, शहांवर टीका करण्याची राऊतांची लायकी आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांवर आरोप कराल तर जशास तसे उत्तर मिळेल. आम्ही बाप-बेटे राऊतांना पुरून उरू, अशा इशारा राणेंनी दिला आहे. तसेच संजय राऊतांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय तपासणीची गरज आहे, असे नारायण राणे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.