‘शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच’, अशी भूमिका आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसैनिक मुंबईत मातोश्री तसेच राणा दाम्पत्यांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर नाकाबंदी केली आहे. तर मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. मात्र, अद्याप राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यास पोहचू शकले नाही.
राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, राणा दाम्पत्य मातोश्रीवर आल्यानंतर त्यांना महाप्रसाद दिला जाईल, अशी भूमिकाही शिवसैनिकांनी घेतली आहे.
राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर शुक्रवार रात्रीपासूनच शिवसैनिकांनी ठाण मांडले आहे. तसेच अमरावतीमधील राणा यांच्या घराबाहेरही शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
तसेच, याप्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.