राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आलेख वरचढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नियमावील जाहीर करण्यात आली. दरम्यान मुंबईकरांकडून कोरोना नियमांचे पालन होत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेत कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचे आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यातही नागरिक यशस्वी झाले आहेत. देशभरासह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेला न घाबरता कोरोनावर मात करू असे, किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मात्र दरम्यान नागरिकांनी कोरोना लसीकरणावर भर दिला पाहिजे. नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. तसेच कालपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत ४५१ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली. या बूस्टर डोससाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.