नवी मुंबईकरांचा मुंबईचा प्रवास अखेर वेगवान होणार आहे. नवी मुंबईकरांना मुंबईचा पल्ला गाठण्यासाठी एक ते दीड तास लागतो, मात्र आता जल वाहतूक सेवेमुळे (वॉटर टॅक्सी) नवी मुंबईकरांना कमी वेळेत मुंबईत जाता येणार आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षा योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबईकरांचा मुंबईला जाण्याचा प्रवास अधिक सोयिस्कर आणि कमी वेळेत होणार आहे. दरम्यान, बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीड बोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येत आहे. बेलापूर येथून भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये, तर कॅटामरान बोटीकरता प्रतिप्रवासी २९० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबर एलिफंटा, जेएनपीटी या जलदमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.