मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांचे कामकाज अधिक पारदर्शक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रत्येक समितीचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे, यासाठी ते YouTube वर थेट प्रक्षेपित (Live Streaming) करण्याची सूचना भाजपच्या नगरसेविका प्रीती साटम यांनी सभागृहात मांडली. या सूचनेला सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली असून, पुढील निर्णयासाठी प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.
सध्या महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये शहर विकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक नियोजन आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जातात. मात्र या बैठकींची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मर्यादित स्वरूपातच पोहोचते. समित्यांचे कामकाज थेट प्रक्षेपित झाल्यास निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि नागरिकांनाही चर्चेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, असा या प्रस्तावामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेच्या प्रत्येक समितीच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण अधिकृत YouTube चॅनेलवर करण्यात यावे. त्यामुळे मुंबईकरांना कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, कोणते निर्णय घेतले जात आहेत आणि विविध लोक प्रतिनिधींची भूमिका काय आहे, हे घरबसल्या पाहता येईल.
या प्रस्तावाला सभागृहात सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर तो महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाची व्यवहार्यता, तांत्रिक बाबी, कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासनिक परिणाम यांचा अभ्यास करून आयुक्त अंतिम मत नोंदविणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.