क्रुझवरी ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. याच ड्रग्जप्रकरणावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परषद घेत नवाब मलिकांवर आरोप केले. मात्र मलिकांनी त्यावर पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याची धमकी मलिकांना दिली होती. मात्र फडणवीसांचे फटाके फुसके निघाले असून भिजलेल्या फटाक्यांचा आवाजही झाला नाही असे मलिकांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणविसांनी केलेल्या आरोपांवर उद्या सकाळी १० वाजता उत्तर देणार असल्याचे मलिकांनी सांगितले आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांच्या मदतीने काय केले आहे हे मी उघड करणार आहे. फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर चौकशी करण्यासाठी तयार असल्याचे मलिकांनी सांगितले आहे.
फडणवीसांनी फोडलेले फटाके हे फुसके निघाले. त्यांच्या भिजलेल्या फटाक्यांचा आवाजही झाला नाही. मात्र मी आता उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. तसेच माझी मुलगी देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा मलिकांनी फडणवीसांना दिला आहे.
नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा खळबळजन आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर आरोप केले आहेत. मलिकांनी मंत्रिपदावर बसून अतिरेक्यांशी जमीन सौदा केला असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून मलिकांनी जमीन खेरदी केली असल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे मुंबईच्या खुन्यांकडून जमीन घेण्याची गरज काय? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तसेच जमीन कावडीमोलाने मलिकांना का मिळाली? टाडा आरोपींची संपत्ती सरकारजमा का नाही? आणि जमिनीच्या व्यवहारात काळा पैसा वापरला? असे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले आहेत.याबाबतचे सर्व पुरावे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.