केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे या नोटीसविरोधात नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. नोटिशीवर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायलयाने दिलासा दिल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवार टीका केली आहे. आज सत्याचा विजय झाला आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांवर सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी राज्य सरकारवर केला आहे.
२०१७मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई पालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.