शिवसेना आणि शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगात शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारीला निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने ऍड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती. यावेळी ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी आयोगाकडे अधिकचे अडीच तास मागितले आहेत.
घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत अशी बाजू ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीदरम्यान मांडली होती. तर, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरच आज सुनावणी होणार असून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा उल्लेख केला. “एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत कोणतीही सुनावणी घेऊ नये किंवा निर्णय करू नये. सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात सोळा आमदार अपात्र ठरवले तर निवडणूक आयोगाचे हसे होईल”, असं ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल म्हणाले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.