BMC Election Result 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांचे निकालांनंतर एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे, या खेपेस निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये अमराठींचा टक्का लक्षणीयरीत्या वाढला आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 76 अमराठी उमेदवार विजयी झाले असून, मुंबईच्या 'मराठी' राजकारणात हा एक मोठा बदल मानला जात आहे. भाजपच्या तिकिटावर सर्वाधिक 33 अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत, तर काँग्रेसने 18 अमराठी चेहऱ्यांना महापालिकेत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांसह इतर सर्वच पक्षांनी अमराठी उमेदवारांना संधी दिली होती, ज्याचा परिणाम आता निकालात स्पष्टपणे दिसत आहे.
पक्षनिहाय आकडेवारी आणि 'मराठी कार्ड'चा प्रभाव
या निवडणुकीत मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे मांडला गेल्यामुळे अमराठी नगरसेवकांचा आकडा शंभरी पार करू शकला नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपनंतर शिवसेना ठाकरे गटाने 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 3, आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 4 अमराठी उमेदवार निवडून आणले आहेत. याशिवाय एमआयएम (AIMIM) चे 7, समाजवादी पार्टीचे 2 आणि मनसेचा 1 अमराठी नगरसेवक महापालिकेत जाणार आहे. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहणारे गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदार आता आपल्याच समाजातील प्रतिनिधीला पसंती देत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
मराठी की अमराठी? महापौरपदासाठी राजकीय खलबते
महापौर नेमका कोणत्या धर्माचा किंवा भाषेचा होणार, यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने "मुंबईचा महापौर हिंदूच असेल" अशी घोषणा केली होती, तर उद्धव ठाकरेंनी "महापौर मराठी की मुस्लिम बसवणार?" असा सवाल महायुतीला विचारला होता. आता 76 अमराठी नगरसेवकांच्या विजयामुळे महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने आता "मराठी हिंदू" महापौर करण्याचे संकेत दिल्याने हा वाद शांत होतो की अधिक चिघळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मराठी माणसाच्या अस्तित्वाची चिंता
अमराठी लोकप्रतिनिधींची वाढती संख्या पाहून गिरगाव आणि दादरमधील काही सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. "मुंबईत मराठी माणसावर अतिक्रमण होत असून, हा बदल भावी पिढीसाठी धोकादायक ठरू शकतो," असे मत 'आम्ही गिरगावकर' संघटनेने व्यक्त केले आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबई हे जागतिक शहर असल्याने येथे विविध भाषिक प्रतिनिधी निवडून येणे स्वाभाविक आहे. आता या 227 शिलेदारांपैकी मुंबईच्या महापौरपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हेही वाचा – Mumbai Mayor Election : मुंबई महापालिकेवर भाजपचा विजयी झेंडा! महापौरसाठी 'हे' नाव जोरदार चर्चेत
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.