मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. अमृता फडणवीस यांच्या प्रतिवादासाठी महापौर किशोरी पेडणेकर सरसावल्या आहेत. अमृता फडणवीसांना टोला लगावताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे.’ तसेच भाजपाकडून मुंबईला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, अमृता ताईंसारखी सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटते. कारण सामान्य स्त्रिया आपण येत्या-जाता रस्त्यावर बघत असतो. दरवेळी उठायचे आणि वेगवेगळे काहीतरी बोलायचे. आज तर त्यांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे, ३ टक्के घटस्फोट वाहतुकीच्या कोंडीमुळे होत आहेत. म्हणजे यांच्यावर आता हसावे की रडावे, असा प्रश्न पडला आहे. करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा भाजपाच्या इतर सामान्य स्त्रियांपासून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अशा सगळ्यांच्या कमेंट आपण ऐकतोय. हे सगळे जावईशोध हेच लावत आहेत, असे त्या म्हणाल्या.
तसेच त्या म्हणाल्या, मुंबईचे रस्ते १०० टक्के गुळगुळीत आहेत असा दाव आम्ही कधीही केला नाही. जिथे आम्हाला खड्डे दिसले, ते भरण्याचे आम्ही काम करत आहोत. अमृता ताईंसहित भाजपच्या इतरांना जो काही त्रास होत आहे, तो फार वेगळा आहे. त्यामुळे मुंबईला नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.