राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची आज दुसरी यादी जाहीर झालीय. या यादीत वर्धा जिल्ह्याच्या 46424 शेतकऱ्यांचा समावेश आहे तर पहिल्या यादीत जिल्ह्याच्या दोन गावातील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्या यादीतील 166 शेतकऱ्यांपैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख 94 हजार रुपये जमा करण्यात आले आहे.
आज सरकारकडून दुसरी यादी जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आधार ऑथेंटिकेशनला सुरुवात केलीय. पहिल्या यादीतील 166 शेतकऱ्यांपैकी 154 शेतकऱ्यांचे आधार ऑथेंटिकेशन झाले आहे. उर्वरित 12 शेतकऱ्यांपैकी 8 शेतकऱ्यांचे आधार नंबर चुकीचे तर चार शेतकरी मृत असल्याने त्यांना सध्या लाभ मिळू शकत नाहीय.
पहिल्या यादीतील 8 शेतकऱ्यांचं बँकेच्या KYC मध्ये आधार नंबर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असल्याचे आधार ऑथेंटिकेशन दरम्यान समोर आले आहे. या शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यांच्या ‘आधार’मध्ये दुरुस्ती करण्यात आली. मात्र योजनेच्या सर्वरवर दुरुस्त आधार नंबर कोण अपलोड करेल. याबाबत शासकीय स्तरावर चर्चा सुरु आहे. हा पहिल्या यादीतला आकडा वर्धा जिल्ह्यासाठी लहान असला तरी राज्यात हा आकडा वाढू शकतो.
या योजनेत जिल्ह्यात 61084 शेतकरी पात्र आहे यापैकी 57733 शेतकरी आधार धारक आहे. 57733 पैकी 46590 शेतकऱ्यांची यादी जाहीर झालीय.दोन यादी नंतर जिल्ह्याचे 11143 शेतकरी प्रतीक्षेत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.