मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नागपूरमधून अयोध्येला करसेवेसाठी गेल्याचा पुरावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. नवभारत वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीत एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्रात करसेवेसाठी अयोध्येला जात असलेल्या करसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळल्याचे दिसत आहे. या छायाचित्रात देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. हे छायाचित्र शंकर महाकाळकर यांनी काढले होते. देवेंद्र फडणवीस यांनी नवभारतचे आभार मानत हे छायाचित्र ट्वीट केले आहे.
त्याकाळी मोबाईल नव्हते, त्यामुळे छायाचित्र सहज उपलब्ध नव्हती. याचा गैरफायदा घेत राजकीय विरोधकांनी पुरावे मागण्यास सुरुवात केली होती. पण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले छायाचित्र पुरावा म्हणून सादर करत देवेंद्र फडणवीस यांनी करसेवा केली होती का ? या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
याआधी उद्धव आणि संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी करसेवा केली होती का ? अशा स्वरुपाचा प्रश्न उपस्थित करत पुरावा मागितला होता. पण फडणवीस यांनी पुरावा सादर केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी या मुद्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.