समाज माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यानंतर, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शनिवारी ( ११ मार्च ) मध्यरात्री दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा व्हिडीओ मॉर्फकरून (मूळ व्हिडीओशी छेडछाड करून ) व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. तसेच, उद्धव गटाच्या आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे.
या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी शनिवारी ( ११ मार्च ) दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ‘विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी’, अशी मागणी करत शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात रात्रभर गोंधळ घातला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.