नवी दिल्ली: आजच्या डिजिटल युगात YouTube हे मनोरंजनापासून अभ्यासापर्यंत सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, व्हिडिओच्या मधोमध येणाऱ्या नकोशा जाहिराती (Ads) सलग व्हिडिओ पाहण्याचा आनंद घालवतात . यावर उपाय म्हणून YouTube 'प्रीमियम' सबस्क्रिप्शनचा पर्याय देते, ज्यासाठी दरमहा खिसा रिकामा करावा लागतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, प्रीमियमची सर्व फीचर्स आता तुम्ही एकही रुपया खर्च न करता वापरू शकता, तर? होय, हे शक्य आहे एका खास भारतीय ब्राउझरमुळे!
रिलायन्स जिओने खास भारतीय स्मार्टफोन युजर्ससाठी 'JioSphere' नावाचा वेब ब्राउझर लाँच केला आहे. क्रोम किंवा फायरफॉक्सप्रमाणेच हा एक सुरक्षित ब्राउझर आहे. विशेष म्हणजे, गुगल प्ले स्टोअरवर हा सहज उपलब्ध असून अँड्रॉइड युजर्स याचा वापर करून YouTube ला अक्षरशः 'प्रीमियम' बनवू शकतात. यासाठी तुम्हाला जिओ सिम कार्ड असण्याचीही सक्ती नाही; तुमच्याकडे कोणताही मोबाइल डेटा किंवा वाय-फाय असला तरी काम फत्ते होते.
जाहिरातींचा विषय कायमचा संपला!
JioSphere चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे अंगभूत 'AdBlock' फीचर. जेव्हा तुम्ही या ब्राउझरमध्ये YouTube वापरता, तेव्हा हे फीचर जाहिरातींना आपोआप ब्लॉक करते. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी किंवा मध्ये येणाऱ्या जाहिराती पूर्णपणे अदृश्य होतात. यामुळे तुम्हाला YouTube प्रीमियममध्ये मिळणारा 'स्मूथ' अनुभव कोणत्याही खर्चाशिवाय मिळतो. केवळ व्हिडिओच नाही, तर सर्च दरम्यान येणाऱ्या नकोशा लिंक्सपासूनही हा ब्राउझर सुटका देतो.
बॅकग्राउंड प्ले: स्क्रीन बंद तरी गाणी सुरूच!
YouTube प्रीमियमचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'बॅकग्राउंड प्ले'. सर्वसामान्य YouTube अॅपमध्ये स्क्रीन बंद केल्यावर व्हिडिओ थांबतो. मात्र, JioSphere वापरताना तुम्ही फोनची स्क्रीन बंद केली किंवा दुसरे अॅप उघडले तरी YouTube वरील गाणी किंवा पॉडकास्ट सुरूच राहतात. संगीतप्रेमींसाठी हे फीचर म्हणजे मोठी पर्वणीच आहे. हे सर्व फीचर्स वापरण्यासाठी तुम्हाला कोणताही विशेष रिचार्ज करण्याची अजिबात गरज नाही.
कसे वापराल हे जादुई फिचर?
JioSphere वापरणे अत्यंत सोपे आहे. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड करा. अॅप उघडल्यानंतर होम पेजवर वरच्या बाजूला तुम्हाला हिरव्या रंगात एक 'AD' चा आयकॉन दिसेल. त्यावर टॅप करून 'AdBlock Plus' हा पर्याय सक्रिय (ON) करा. बस! आता या ब्राउझरमध्ये YouTube.com उघडा आणि जाहिरातींशिवाय आपल्या आवडत्या व्हिडिओंचा आणि म्युझिकचा आनंद घ्या.
टेक विश्वातील क्रांती
डिजिटल इंडियाच्या मोहिमेत स्वदेशी ब्राउझरने दिलेली ही सुविधा टेक प्रेमींसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही. डेटा प्रायव्हसी आणि एड-ब्लॉकिंगची ही सांगड वापरकर्त्याचा इंटरनेट अनुभव अधिक समृद्ध करते. सध्याच्या काळात जिथे प्रत्येक सेवेसाठी पैसे मोजावे लागतात, तिथे JioSphere सारखा पर्याय युजर्सच्या पैशांची आणि वेळेची मोठी बचत करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.