मुंबई, ६ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील ८ आमदारांनी नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेतील काही आमदार, खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रपतींचा दौरा अर्धवट सोडून नागपूरहून बुधवारी मुंबईत परतले.
तसेच बुधवारी रात्री उशीरा वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांसोबत बैठक घेतली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, बहुमताचा आकडा असताना एक गट नव्याने विलीन होत असेल तर याचा अर्थ तुमची गरज संपली, आता तुम्ही गाशा गुंडाळा. असे राऊतांनी शिंदे गटावर मिश्किल टीका केली आहे.
उद्धव गटातील खासदार संजय राऊत म्हणाले की,
त्यांच्या गटामध्ये काय चाललं आहे ते आम्ही पाहायला बसलेलो नाही. अजित पवार यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एका ओळीमध्ये प्रतिक्रिया दिली ‘नांदा सौख्य बरे’. हे आम्ही आधीच सांगितलं आहे तुम्हाला. पण त्यांच्याबद्दल ज्या बातम्या आम्ही वाचतोय, पाहतोय हे अपेक्षितच होतं. हा त्यांचा औटघटकेचा खेळ आहे. कारण बहुमतासाठी १७० चा आकडा असतानाही राष्ट्रवादीचा ४० जणांचा एक गट नव्याने विलीन केला जातो, याचा अर्थ असा आहे तुमची गरज संपली. आता तुम्ही गाशा गुंडाळा, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी यावेळी मांडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.