कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रण

कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रण

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे गेले अनेक दिवस आंदोलन सुरु होते. परंतु, कुस्तीपटू पुन्हा नोकरीवर रुजू होत असल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले होते. पण या चर्चांना ट्विट करत कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार नाही अशा आशयाचे प्रत्युत्तर दिले. याच पार्शवभूमीवर केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तर, आता “सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे” असं ट्विट क्रीडामंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने माध्यमांना माहिती दिली होती, कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची शनिवारी (दि.३ जून) रोजी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचंही यावेळी बोलताना बजरंग पुनिया यांनी सांगितले होते. तर सोमवारी (दि. ५ जून) कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेऊन रेल्वेतील नोकरीवर परतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी हे वृत्त फेटाळत आपल्या ट्विटमधून आंदोलनातून माघार नाही अशा आशयाचे प्रत्युत्तर दिले.

तसेच त्यांनी सोमवारी (दि. ५ जून) यासंदर्भात एक ट्वीट करत “आमच्या पदकांना १५-१५ रुपयांचे म्हणणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागलेत. आमचं संपूर्ण आयुष्य दाव्यावर लागलं आहे, त्यासमोर नोकरी ही फार छोटी गोष्ट आहे. नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल, तर तिच्यावर पाणी सोडताना आम्ही सेकंदही विचार करणार नाही. आम्हाला नोकरीची भीती दाखवू नका’ अशी आक्रमक प्रतिक्रिया कुस्तीपटूंनी व्यक्त केली.

दरम्यान, कुस्तीपटूंना केंद्र सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रण आल्याने या चर्चेत आता तरी कुस्तीपटूंना न्याय मिळणार की फक्त चर्चाच होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version