रायगड: रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली महामार्गावर पळसदरी परिसरात बुधवारी भीषण अपघात घडला. वॅगनार कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी परिसरातून दुचाकीने प्रवास सुरू असताना समोरून येणाऱ्या वॅगनार कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील सोनाली (रा. अंबरनाथ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक रोहित वाघमारे यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली. स्थानिकांच्या सहकार्याने रोहित वाघमारे यांना तात्काळ कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामांबाबत संताप व्यक्त केला आहे. अर्धवट अवस्थेतील रस्ता, अरुंद मार्ग आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्थेचा अभाव यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. संबंधित रस्त्यावरील कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.