मुंबई,६ मे २०२३, प्रतिनिधी : यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवायला लागल्या. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये उन्हाची तीव्रता किती असेल, याचा विचारच नकोसा झाला; पण अशात मार्चमध्ये पावसानं हजेरी लावली आणि सगळीकडे खळबळ उडाली. मग निसर्ग चक्र बिघडू लागल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. त्यामुळेच आज आपण पाऊस फक्त जून ते सप्टेंबर या काळातच पडणं अपेक्षित आहे का? अवकाळी पाऊस का पडतो? पावसाचं चक्र कसं असतं? हे जाणून घेणार आहोत :
दरवर्षी जून ते सप्टेंबर व्यतिरिक्त पडणाऱ्या पावसाला आपण अवकाळी पाऊस असे संबोधतो. या वर्षी देखील मार्च, एप्रिल महिन्यात पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पाऊस हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. परंतू हा शब्दप्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. कारण ज्यावेळेस आपण वार्षिक पर्जन्यमानाची आकडेवारी काढून संशोधन करतो. त्यामुळे या आढाव्यांच्या आधारे आपण आपल्या सोयीसाठी १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी निवडला आहे. त्यामुळे संपूर्ण पाऊस या कालावधीतच पडतो, अशी आपली धारणा झाली आहे. पण प्रत्यक्षात मान्सूनचा ८० टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबरमध्ये पडतो तर उर्वरित पाऊस हा उन्हाळा आणि हिवाळ्यात पडतो.
उन्हाळ्याच्या सुरुवातील म्हणजेच मार्च महिन्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापासून उष्ण वारे वाहू लागतात. पण महाराष्ट्रात आल्यानंतर या उष्ण वाऱ्यांचा मेळ उत्तरेकडील थंड वार्यांशी होतो. त्यामुळेच महाराष्ट्रात मार्चमध्ये पाऊस पडतो. हा पाऊस एका विशिष्ट प्रकारच्या ढगातून पडतो . त्यांना वादळी ढग असे म्हंटले जाते. त्यामुळे या काळात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकतासह पाऊस पडतो.
तर दुसरीकडे एप्रिल आणि मे महिन्यात मान्सूनचा प्रवाह देशाजवळ येण्याअगोदर हवेतील बाष्प आणि तापमान वाढलेले असते. त्यामुळे या दोघांचे मिश्रण होऊन वळवाचा पाऊस पडतो. यालाच पूर्वमान्सून असे म्हणतात. तर याउलट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मान्सून परत जायला निघतो, त्यावेळी परतीच्या पावसाच्या सरी पडतात. एकूणच वाऱ्यांची बदलती दिशा आणि तापमानातील बदल यामुळे वर्षभरात वेगवेगळ्या वेळी पाऊस पडतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.