उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, “आपल्या आमदारांना शिवसेनेचा व्हिप लागू होणार नाही”, असे उद्धव गटाचे नेता उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “ज्यावेळी दोन गटांना मान्यता दिली गेली तेव्हाच दोन वेग- वेगळे गट आहेत, अशी मान्यता मिळाली”. “तेव्हाच जर दोन्ही गटांना वेग- वेगळी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहेत तर आता आपल्या आमदारांना शिवसेनेचा व्हिप लागू होणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “शिंदेंना धनुष्य पेलवणार नाही, शिवसेना संपवण्यासाठी हा काहींचा प्रयत्न आहे”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यावेळी, शिवसेनेच्या प्रतोदांकडून शिवसेना पक्ष म्हणून उद्धव गटाला व्हिप जारी केला जाऊ शकतो. हा व्हिप उद्धव गटाच्या आमदार आणि खासदारांना पाळणे बंधनकारक होईल. तसेच जे हा व्हिप पाळणार नाहीत त्यांना अपात्र ठरवले जाईल, असे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरेंनी व्हिप लागू होण्याचे नाकारले असले तरी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र “व्हिप बजावणारच”, असे म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.