जलबोगद्याच्या कामामुळे मुंबईत १५ दिवस पाणी कपात सुरू असतानाच मुंबईकरांसाठी आणखी एक बातमी समोर येतेय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ ३७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मुंबईवर पुन्हा एकदा पाणी कपातीची टांगती तलवार आहे. पावसाळा उशिराने सुरू झाल्यास मुंबईवर पाणी कपातीचं संकट ओढावू शकतं. त्यामुळे, आतापासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्ये वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या सात धरणांमधून मुंबईकरांना पाणीपुरवठा होत असतो. या धरणांमध्ये मुंबईताला ३८०० दशलक्ष लिटर प्रति दिवस पाणीपुरवठा केला जातो. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या सातही धरणांची एकूण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. परंतु, या धरणांमध्ये सध्या ५ लाख ४५ हजार १९८ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसानुसार मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल अशा पद्धतीचं नियोजन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.
मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जल बोगद्याच्या ठाणे येथील कुपनलिकेच्या खोदकामामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मुंबई आणि ठाण्यात ३० एप्रिलपर्यंत १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.