माघी यात्रा काळात भाविकांनी भरभरून विठ्ठलाच्या चरणी दान अर्पण केल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे यात्रा काळाच्या दरम्यान उत्पन्न चौपट झाले. भाविकांनी ४ कोटी ८८ लाख ६२ हजारांचे दान विठ्ठल चरणी अर्पण केले. यामध्ये सोने, चांदी,रोख देणगी,हुंडी पेटीतील रक्कम आणि भक्त निवास मधून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश आहे.
या माघी काळात वसंतपंचमी दिवशी एका भाविकाने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर जवळपास पावणेदोन कोटी रुपयाचे सोन्या चांदीचे दान दिल्याने या उत्पन्नात फार मोठी वाढ झाली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी माघीसाठी विक्रमी संख्येने वारकरी आले होते. सुमारे पाच लाख भाविकांनी श्रींचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. भाविक संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मंदिर समितीला प्राप्त झालेल्या उत्पन्नाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा माघी यात्रा काळात मंदिर समितीचे उत्पन्न मागील वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे. यंदा माघी एकादशीला पंढरीत मोठ्या संख्येने वारकरी आले होते. यंदाच्या कार्तिकी यात्रेहून अधिक विक्रमी माघी यात्रा झाल्याचे दिसून आले. एकादशीच्या दिवशी सुमारे पाच लाख वारकरी पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आले होते.
विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल १ कोटी ५९ लाख ९० हजार रुपयांचे दागिने आले आहेत. ६ लाख ७१ हजार रुपयांचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत. त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने आल्याने मंदिर समितीच्या वेदांता, व्हिडीओकॉन, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथून एकूण १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर ३२ लाख रुपये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पायावर देणगी जमा झालेली आहे. मंदिर समितीच्या हुंडी पेटीतून गत वर्षीच्या तुलनेत दुप्प्पट म्हणजे ७८ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ऑनलाईन स्वरुपात १२ लाख ४१ हजार रुपये देणगी जमा झाली आहे. एकूणच यंदाची माघी यात्रा मंदिर समितीसाठी देवाचा खजिना भरणारी झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.