गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अनेक भाग जलमय झाले, तर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. महापौर अजीव पाटील यांनी शहराला कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा विशेष निधी राखून व्यापक आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित केली.
नालेसफाईऐवजी कायमस्वरूपी उपायांवर भर
बैठकीत महापौरांनी स्पष्ट केले की, दरवर्षी नालेसफाईवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला तरी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे केवळ गाळ काढण्यावर अवलंबून न राहता पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होईल अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून दीर्घकालीन नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या जलमार्गांचा अभ्यास करण्याची सूचना
महापौरांनी प्रशासनाला शहरातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक जाणकार आणि शेतकऱ्यांच्या मदतीने नैसर्गिक पाण्याच्या जुन्या प्रवाहांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले. कालांतराने बंद झालेल्या जलमार्गांचा शोध घेऊन ते पुन्हा सुरू करणे किंवा आवश्यक ठिकाणी नवीन नाले उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा, असे त्यांनी सुचवले. तसेच पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या संरचना संबंधित विभागांची परवानगी घेऊन हटविण्याचीही सूचना करण्यात आली.
रेल्वे प्रशासनालाही महत्त्वाच्या सूचना
बैठकीत रेल्वे हद्दीतील नाले आणि कल्व्हर्टची अपुरी सफाई हा पूरस्थितीमागील एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील प्रमुख नाल्यांचे रुंदीकरण तसेच रेल्वे हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी नवीन गटारे आणि नाले उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परवानगी प्रक्रियेमुळे अनेक ठिकाणी नालेसफाई वेळेत होत नसल्याने गाळ साचतो आणि पाणी तुंबते, असेही त्यांनी नमूद केले.
रेल्वे प्रकल्पांचाही परिणाम?
रेल्वे मार्ग रुंदीकरण आणि नवीन फलाट उभारणीदरम्यान काही नैसर्गिक जलवाहिन्या अरुंद झाल्याने पाण्याचा निचरा बाधित होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. याचा परिणाम शहरातील नागरिकांसह रेल्वे वाहतुकीवरही होत असल्याचे सांगत या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रदीप पाचंगे, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.