US Aviation Safety Agency Report : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत 260 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, विमानातील केवळ एकच व्यक्ती बचावली आहे. सुरुवातीला तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात असले तरी, आता अमेरिकेच्या हवाई सुरक्षा संस्थेने केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
अपघातापूर्वीचे ते थरारक काही सेकंद
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमानाचे पायलट सुमित सभरवाल यांना धोक्याची जाणीव झाली होती. विमान 650 फूट उंचीवर असताना त्यांनी 'मेडे, मेडे, मेडे' असा आपत्कालीन संदेश (Emergency Message) धाडला होता. मात्र, तांत्रिक मदतीपूर्वीच विमान अनियंत्रित झाले आणि विमानतळाच्या जवळच असलेल्या मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर जाऊन धडकले. या भीषण धडकेत विमानाने पेट घेतला आणि विमानातील 260 लोकांचा करुण अंत झाला.
इलेक्ट्रिक यंत्रणेतील जुनी बिघाड ठरली घातक
सेफ्टी फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ईडी पियरसन यांनी या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, बोईंग 787 ड्रीमलाइनर (रजिस्ट्रेशन VT-ANB) या विमानात गेल्या अनेक महिन्यांपासून इलेक्ट्रिक यंत्रणेत गंभीर समस्या होत्या. तपासात असे आढळले आहे की, विमानात वारंवार शॉर्ट सर्किट, वायरिंगमधील दोष आणि धूर निघण्याच्या घटना घडल्या होत्या. इतकेच नाही तर, याच इलेक्ट्रिक बिघाडामुळे या विमानाचे पूर्वी अनेकदा आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) देखील करण्यात आले होते.
हेही वाचा – Air India च्या 4,000 कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड! फ्री तिकिटांचा केला गैरवापर; टाटा समूहाचा मोठा निर्णय
महत्त्वाची कागदपत्रे लपवल्याचा संशय
अमेरिकन एजन्सीने असा आरोप केला आहे की, तपास अधिकाऱ्यांकडे विमानाशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सोपवण्यात आली नाहीत. विमानाचा 'P100' पॉवर पॅनेल अनेकदा बदलण्यात आला होता, तरीही विमानाला आवश्यक असलेले सॉफ्टवेअर प्रोटेक्शन आणि तांत्रिक सुधारणा (Modification) करण्यात आल्या नव्हत्या. "हे विमान उडवण्यासाठी फिट नव्हते, तरीही त्याला उड्डाणाची परवानगी कशी मिळाली?" असा गंभीर प्रश्न आता या दाव्यामुळे उपस्थित झाला आहे.
डिझाइन आणि सॉफ्टवेअरमधील त्रुटी
पियरसन यांनी नमूद केले की, विमानाच्या मूळ डिझाइनमध्येच दोष होता आणि त्याला तातडीने मॉडिफिकेशनची गरज होती. इलेक्ट्रिक सिस्टममधील बिघाडामुळे विमानाच्या नियंत्रण कक्षात बिघाड झाला असावा आणि त्यामुळेच पायलटना विमान सावरता आले नाही. या खळबळजनक खुलाशामुळे आता बोईंग कंपनी आणि एअर इंडियाच्या देखभाल विभागावर (Maintenance Department) कडक कारवाईची मागणी होत आहे. या अपघाताचा सखोल तपास सुरू असून जागतिक स्तरावर याकडे लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचा – Induction Buying Guide: LPG संकटात इंडक्शन घेताय? घाई नको, आधी 'हे' वाचा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.