Maharashtra Unseasonal Rain – Hailstorm : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये गारपीट-वादळाचा कहर; शेतकरी हवालदिल, पुढील 2 दिवस चिंतेचे

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सुरूवात झाली आहे.
Maharashtra Unseasonal Rain – Hailstorm : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये गारपीट-वादळाचा कहर; शेतकरी हवालदिल, पुढील 2 दिवस चिंतेचे

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सुरूवात झाली आहे. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील पिकांचे, धान्याचे अतोनात नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे अजून काही दिवस अवकाळी पाऊस किंवा गारपीट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनाचक कोसळणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज, बुधवारी कोल्हापूर, सोलापूर, बारामती, निफाड आणि फलटण तालुक्यात गारपिटीचे दृश्य पाहायला मिळाले. 

हेही वाचा : BJP vs Shiv Sena: ‘भाजपने केसानं गळा कापला…’; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

कोल्हापुरातील कसबा बावडा येथे वादळासह बर्फवृष्टीसह पावसानं हजेरी लावली. रस्त्यावर दहा मिनिटात बर्फाचे थर तयार झाले. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात गारांसह मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तशा पद्धतीने राज्यभर अनेक ठिकाणी गारांसह पाऊस पडत आहे. आज बारामती तालुक्यातील बाबुर्डी, शेरेवाडी आणि इतर जिरायती गावात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस कोसळला आहे. पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. येथील कोटमगाव, खानगाव या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. तर लासलगाव, टाकळी विंचूर यासह परिसरात पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पाऊस-गारपिटीमुळे कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा यासह काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. फलटण तालुक्यातही गिरवी धुमाळवाडी परिसरात गारांचा पाऊस पडला. त्यामुळे धुमाळवाडीतील फळबागांचे मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून संध्याकाळच्या सुमारास फलटण तालुक्यात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील फळबागेतील फळांचे देखील नुकसान झाले आहे. फलटण तालुक्यात ठिकठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला असून फळबागांसह हरभरा, ज्वारी व गहू या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात गारपीट झाली. गारपीटीमुळे अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरातील ज्वारी पिकाचे नुकसान झाले. ऐन हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरीराजा मेटकुटीला आला आहे. उद्या गुढी पाडव्याच्या सणाच्या अगोदर अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांवर गारपिटीने संक्रांत आल्याचं एकूणच चित्र दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version