अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून राज्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरु आहे. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाई अंतर्गत गेल्या काही दिवसांत शेकडो ठिकाणी छापे टाकण्यात आले असून अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. काही दुकानांवर बंदीची कारवाईही करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर 25 मे ते 11 जून या कालावधीत प्रतिबंधक गुन्ह्यामध्ये 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये, 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे.
याचबरोबर FDA ने राज्यभरात गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांविरोधातही मोठी मोहीम सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे भेसळयुक्त अन्न-पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच तुकाराम मुंढेंनी राज्यातील गुटखा माफियांवरोधात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.
तुकाराम मुंढेंनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध विक्रेत्यांसोबतच आता उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 म्हणजेच मकोका लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार आहे. जर अशा अन्नपदार्थांचा व्यापार कोणी केला आणि गुन्हा दाखल झाला तर यामधून कोणाचीही सुटका होणार नाही, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. दरम्यान मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. जामीनासाठी अत्यंत कडक कायदेशीर अटींचा सामना करावा लागतो. गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी धडक मोहीम राबवली आहे. त्यानुसार आता पडद्यामागून सूत्रे हलवणारे देखील लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेत्यांसोबत मुंढे यांच्या रडारवर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.