मीरा भाईंदर महापालिकेतील अभियंत्याची कॉलर पकडत आमदार गीता जैन यांनी त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळं जैन या वादाच्या भोवऱ्या त अडकल्या असून आपल्या या कृतीवर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
महापालिका हद्दीतील एका कुटुंबाचं घर पाडण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यासह पथक गेलं होतं. राहत घर पडून बेघर होण्याच्या भीतीनं या कुटुंबानं आमदार गीता जैन यांच्याकडं धाव घेतली. जैन या घटनास्थळी दाखल झाल्या अन् नियमावर बोट ठेवत कारवाईचा बडगा कशासाठी? असा जाब विचारला.
“लहान मुलं असलेलं घर पाडायला तुम्ही आला आहात माणसं आहात की राक्षस” असं जैन यांनी अभियंत्याला सुनावलं. यावेळी ज्या महिलेच्या घरावर हातोडा पडणार होता ती पीडित महिला जैन यांना रडून कारवाईबाबत सांगत होती. याचवेळी अचानक आमदार जैन चिडल्या आणि त्यांनी अभियंता शुभम पाटील यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आपल्या या कृतीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार गीता जैन म्हणाल्या, “मी अभियंत्याशी बोलताना पावसाळ्यात अनधिकृत असली तरी त्या घरांमध्ये कोणी राहत असल्यास ती तोडू नयेत असे शासन आदेश आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून देत होते. पण मी बोलत असताना अभियंता हसत असल्यानं आपला पारा चढला आणि मी त्याच्या कानशिलात लगावल्या.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.